शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

नेटके मथळे : ८८

नेटके मथळे--८८
----------------------------
लोकसत्ता दि. २२ आक्टोबर २०१३ मधून
-----------------------------------------
वर्तमान पत्रात आपल्याला कधी कधी नेटके मथळे दिसत नाहीत. किंवा ते खुपतातच. असे एकेक मथळे उदाहरण म्हणून घेऊ यात. आता हा एका पहिल्या पानावरच्या बातमीचा मथळा पहा : " दहावीचे विद्यार्थी ऐन दिवाळीत अर्जबाजारी होणार"
अर्थातच "अर्जबाजारी" असा काही मराठीत शब्द नाही पण "कर्जबाजारी"ला यमक जुळवत व त्या अर्थाने हा शब्द इथे वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यास पुष्कळांचे देणे आहे असा किंवा देणी देण्यास असमर्थ असलेला असा बॅंक्‌रप्ट ह्या अर्थाने "कर्जबाजारी" आपण वापरतो. कर्जबाजार्‍याला जसे एकेकाचे कर्ज फेडावे लागते तसे काहीसे इथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे झाले आहे असे ह्या बातमीदाराचे/संपादकाचे मत आहे. बातमीत म्हटलेय की ऑनलाईन अर्ज करायचा होता तो काही तांत्रिक बाबींमुळे होत नाहीय तर आता दिवाळीच्या सुटीत हे अर्ज मॅन्युअली भरावे लागणार आहेत. कर्जबाजारी जसा कर्ज भरण्यास समर्थ नसतो तसे काही इथे अर्ज करण्याची असमर्थता दिसत नाहीय. फक्त ऑनलाईन ऐवजी मॅन्युअली अर्ज करावे लागताहेत व सुटीत हे करावे लागते आहे हे बातमीत कळते. अर्ज करण्याची असमर्थता इथे दिसत नाही. म्हणजे अर्जबाजारीपणा दिसत नाहीय. हां अर्ज-बेजारीपणा अवश्य आहे.
नवीन शब्द करणे आणि ते लोकांच्या अंगवळणी पडावेत म्हणून आवर्जून वापरणे हा हेतू निश्चितच चांगला आहे. पण हा मथळा नेमका/नेटका होत नाही. मग काय असायला हवा होता ? तर, "दहावीचे विद्यार्थी ऐन दिवाळीत अर्जबेजार !"
----------------------------------------------

शुक्रवार, १५ जुलै, २०१६

वर्तमानाचे भूत

वर्तमानाचे भूत !

भूत काळ हा माणसाच्या मागे एखाद्या भूतासारखा लागलेला असतो, असेच ह्या बातमीच्या शीर्षकावरून दिसतेय.

प्रघाताप्रमाणे कोणी कोणाला मारूनच टाकले तर आपण म्हणतो : He shot her dead !  आता ह्या वाक्याला वर्तमान काळात आणायचे तर He shoots her. एव्हढेच म्हणावे लागते. जेव्हा आपण कोणाला शूट करतो तेव्हा तो त्यात मेला की नाही हे नंतरच कळते व त्यामुळे वर्तमान काळात “तो तिला शूट करतो” एव्हढेच म्हणावे लागते. बातमीदाराला ती बाई मेली आहे हे सांगायचे असल्याने त्याला डेड हा शब्द वापरणे अगत्याचे होते. त्यामुळे त्याने व्याकरणाची क्षमा मागत Techie  shoots dead doctor wife असे केले आहे. व्याकरणाची क्षमा ह्यासाठी की जे वाक्य आहे त्याचा अर्थ तो  डॉक्टरच्या मेलेल्या पत्नीला शूट करतो, असा होतो.

वर्तमान पत्रात वर्तमान काळात बातमी देणे किती कठीण ! इतका भूताचा धाक !

-------------------------

बुधवार, ३० एप्रिल, २०१४

भय महाराष्ट्र !

"भय महाराष्ट्र !"
----------------------------
आजच्या लोकसत्तेतल्या पहिल्या पानावरच्या बातमीचे हे शीर्षक आहे. महाराष्ट्र दिनी आपण "जय महाराष्ट्र " म्हणतो, त्याच महाराष्ट्रात कोणावर अत्याचार होतो आहे त्यामुळे महाराष्ट्राचा जय हो म्हणायच्या ऐवजी महाराष्ट्रात भय आहे अशा अर्थाची ही बातमी आहे.
महाराष्ट्र दिनी "जय हो" म्हणताना ही भीती कशी आहे ते सांगताना "जय " ला जुळणारे "भय " वापरणे हे संपादकांची उर्मी/लालित्य  दाखवणारे असले तरी अर्थात घोटाळा करणारे आहे. नुसते "जय " जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ "जय हो " किंवा "जय होवो " असा असतो . त्यामुळे "भय महाराष्ट्र " म्हणताना "महाराष्ट्राचे भय होवो/ वाटो" अशा अर्थाचे होते व ते संपादकांना इथे अभिप्रेत नाहीय .
जय ही ललकारी आहे तर भय ही एक भावना आहे. जय हे यश ह्या अर्थाने वापरतात . त्याउलट अर्थ उमटवायचा तर "हार" किंवा "पराजय " वापरता येईल. पण भय अनुचितच .
जय महाराष्ट्र ला यमकच करायचे तर काय महाराष्ट्र , खाय महाराष्ट्र , गाय महाराष्ट्र, चय, दय, तय, थय , मय , रय , लय , वय , सय , असे अनेक पर्याय वापरता आले असते पण त्यात अशा महाराष्ट्राचा पराजय होवो असा अर्थ येत ना !
कदाचित ते "अ-जय महाराष्ट्र" णे साधले असते !
--------------------------------------------------------

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

मुतदेह

---------------------------------------------  
नेटके मराठी मथळे
------------------------------
अंगावरचे दागीने लुटून मुतदेह नदीत फेकले !
-------------------------------
छापताना अनावधानाने ज्या चुका होतात त्याला मुद्रा-राक्षसाच्या चुका असे का म्हणतात हे कळायचे असेल तर वरचा एक मथळा वाचा. हा आलाय आजच्या सामना मध्ये.
मराठी इतिहासात ध चा मा करणे असे एक प्रकरण आहे. ज्यात नायायणराव पेशवेंना "धरावे" असा हुकूम राघोबादादांनी गारद्यांना दिलेला असतो. त्यात बदल करीत ( डोळ्यातले काजळ वापरीत ) आनंदीबाईंनी म्हणे त्यात ध चा मा करीत "मारावे" केले व एक मोठा प्रसंग घडला. उ काराचे तोंड नेहमीप्रमाणे न राहता फिरल्याने हा घोटाळा झाला. काही मराठी टंकलेखनात रुफार काढण्यासाठी R व नंतर u दाबावे लागते. त्यातले R हे इथे दबले नसावे व नुसते u दबल्याने "मृतदेह" हा मुतदेह झाला !
------------------------------------------

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

-------------------------------------------------------
 नेटके मराठी मथळे
------------------------------
"परत आकारात"     ( मटा दि.३ आक्टोबर २०१३ मधून )
-------------------------------------------
ही बातमी आहे ऐश्वर्या राय ही बाळंतपणात जो लठ्ठपणा येतो त्यातून व्यायाम करून परत आपल्या मूळ सौष्ठवाकडे येते त्यासंबंधी. पण शीर्षक आहे "परत आकारात". आकार लहान किंवा मोठा असतो. म्हणजे रोड किंवा लठ्ठ हे आकारच असतात. त्यामुळे नुसते "परत आकारात" म्हटल्याने ती रोड झालीय ही बातमी पोचत नाही. इंग्रजीत जसे "परत शेप-मध्ये" म्हटले की जो शेपचा सौष्ठव हा अर्थ येतो तो "परत आकारात"ने येत नाही. त्यामुळे शीर्षक हवे होते, "परत सौष्ठवात" किंवा "परत सौष्ठवाकडे". कित्येक वेळा नुसते रोड असणारी व्यक्ती सुंदर, सुडोल दिसेल असे नाही. त्यामुळे सौष्ठवात जसा योग्य ठिकाणी भरदार व योग्य ठिकाणी रोड असा अर्थ येतो तो "आकारात"ने येत नाही.
---------------------------------------------   aish
नेटके मराठी मथळे
--------------------------------
"महासत्तेतील मुखंड" ( लोकसत्ता: दि.२ आक्टोबर २०१३ मधून )
---------------------------------------
"मुखंड" म्हणजे पुढारी, मुख्य, किंवा म्होरक्या असा अर्थ आहे हे फार थोड्यांनाच माहीत आहे. संपादकाचे काम जर "शहाणे करून सोडावे, सकल जन’ असे मानले तर हा शब्द शीर्षकात वापरला हे चांगलेच धोरण म्हणावे लागेल. पण त्याच बरोबर आपल्याला जे म्हणायचे आहे ते नेमकेपणे म्हणणे हे लेखकाचे "मूळ कसब" निष्ठेने वापरायचे म्हटले तर गोंधळाचीच परिस्थिती आहे असे जाणवेल. कसे ?
संपादकीय आहे अमेरिकेचे काही व्यवहार सध्या जे बंद झाले आहेत ते कसे रिपब्लिकन पार्टीच्या कॉंग्रेस मधल्या पुढार्‍यांनी अडेलतट्टू धोरण अवलंबित ओबामाला हेल्थकेअर साठी पैसे नाकारले त्यावरच्या टिप्पणीचे आहे. म्हणजे ह्यातून संपादक आपल्याला जाणवून देत आहेत की हे पुढारी "अडेलतटटू" आहेत. अमेरिका ही महासत्ता व त्या महासत्तेतील हे मुखंड पहा ! असेच संपादक दाखवत आहेत.
मुळात "मुखंड" हा वापरातला शब्द नाही. तशात पुन्हा ह्या शब्दाला भूखंड, मूर्ख, खंड इत्यादी शब्दांच्या अंशामुळे व ह्या अंशाच्या अर्थामुळे एक प्रकारचा नकारार्थी अर्थ येतो. नुसता मुखंड हा शब्द घेतला व त्याचा शब्दकोशातला अर्थ घेतला तर त्यात नकारात्मक काही नाही. पण आजकाल राजकारणातले पुढारी त्यांच्या वर्तणुकीने एवढे नकारात्मक झालेले आहेत की ह्या शब्दालाच एक नकारात्मक अर्थ आलेला आहे. ( हा शब्द मुळात कसा वापरीत असत हे पाहताना तुकडोजींच्या ग्रामगीतेतला हा उल्लेख पहा : जो करील कायदाभंग । त्यासि दंड द्यावा लागवेग । यासाठी नेमावा लागे मग । राजा सत्ताधीश मुखंड ॥ ( अध्याय आठवा, ॥२०॥ )).
त्यामुळे योग्य शीर्षक/मथळा द्यायचा तर, "महासत्तेतील अडेलतटटू" हे जास्त नेमके झाले असते !
-------------------------------------------------------

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

http://epaper.loksatta.com/c/1711717

----------------------------------------
नेटके मराठी मथळे
--------------------------
लोकसत्ता ( दि.१ आक्टोबर २०१३) मधून
------------------------------------
बुडाला यादवी पापी.....
-------------------------
लालू यादवांना जेलमध्ये घातले त्यावरच्या संपादकीयाचे हे शीर्षक खासा शैलीतले आहे. एका ऐतिहासिक घोषणेची आठवण करून देणारे हे शीर्षक आहे. "बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला" असे पूर्वी म्हटले गेलेले आहे, त्याचीच हे आठवण काढणे आहे.
"औरंग्या" हे औरंगजेबाला हिणवणारे संबोधन असून ते पुल्लिंगी आहे. ( म्हणूनच बुडाला वापरले.). इथे यादव ह्यांना हिणवायचे असते तर "यादव्या" करता आले असते व ते पुल्लिंगीच राहते. पण "यादवी" हा शब्द स्त्रीलिंगी वापराचा आहे. जसे: यादवी माजली, किंवा माजवली. बरे, हे पापी कोण आहे त्याचे हे जातीवाचक विशेषण आहे असे मानले तर ते केवळ "यादव" असेच म्हणायला हवे. जसे: "ब्राह्मण जातीचा पापी" म्हणताना आपण "ब्राह्मणी पापी" म्हणत नाही . सबब वरील शीर्षक हे चुकीचे आहे.
मग, कसे असायला हवे होते हे शीर्षक ? तर, १) बुडाला यादव्या पापी ;  किंवा २) बुडाली यादवी पापी ; ३) बुडाला यादव पापी.
------------------------------------------