-----नेटके मराठी मथळे---------
---------------------------------------------
लोकसत्ता ( १४-१०-२०११ ) मधून
---------------------------------------------
१) "धनादेशाद्वारे वीजबिल भरणार्या ग्राहकांना "महावितरण"चा झटका"
काही काही शब्द अंगवळणी पडले की ते मराठी की बिगर-मराठी हे कळेनासे होते. आता "चेक" हा शब्द "बिल" इतकाच इंग्रजी आहे. त्याला "धनादेश" म्हणताना एक पर्यायी शब्द रूढ करणे ही चांगली सद्भावना आहे. मग असेच धोरण ठेवून "वीजबिल" ऐवजी "वीजदेयके" ही चांगले ठरले असते.
२) "सायनात नंबर वन होण्याची क्षमता: अपर्णा"
"नंबर वन" हेही इंग्रजी, शिवाय "सायनात क्षमता" हे भाषांतर केल्यासारखे होते. त्याऐवजी "सायनाला अग्रक्रमांक शक्य: अपर्णा" हे कसे वाटेल ?
३) "नॅशनल स्कूल ऑफ दुबे"
हे "नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा"चे विनोदाने केलेले सूचक नामाभिधान आहे. आपल्याकडे "कर्व्यांची शाळा"; "आगरकरांची शाळा"; "नापासांची शाळा" असे म्हणत. त्याच धर्तीवर "दुब्यांची शाळा" चालले असते व ते गुरुस्थानी होते हेही जाणवले असते.
४) "भारताच्या विजयाला धोनीचा "परिसस्पर्श"".
लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते. धोनीचा स्पर्श हा परिसस्पर्श आहे असे म्हणायचे असेल तर मग तो "विजयाला" न म्हणता "भारताच्या हरण्याला" हे रास्त ठरले असते.
५) "पालिका वेतनकरारावर आज कोर्टाचा निर्णय"
कोर्ट जितके इंग्रजी व अंगवळणी तेवढेच न्यायालयही अंगवळणी पडलेले आहे. मग त्याचा प्रसार का करू नये ?
--------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा