गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

लोकसत्ता की शुद्धलेखनाची सत्ता !






लोकसत्ता ( दि.२७ फेब्रुवारी २०१२) मधून
----------------------------------------------
१) "अणुबॉम्बरोधक पोलीस इमारतीचा प्रस्ताव आयुक्तांनीच फेटाळला"
इमारती बांधतांना समजा त्या भूकंपाचे तीव्र कंप/झटके सहन करणार्‍या अशा बांधतात, तेव्हा त्यांना भूकंपविरोधक किंवा भूकंप-रोधक  कसे म्हणता येईल ? त्या काही भूकंप थांबवत नाहीत, फार तर त्या भूकंप साहतात. तेव्हा त्यांना भूकंप-साहक म्हणणे ज्यास्त सयुक्तिक होईल. तसेच एखादी ईमारत अणुबॉम्ब हल्ल्याचे परिणाम साहणारी असेल तर तिला "अणुबॉम्ब-रोधक" कसे म्हणता येईल ? अणुबॉम्ब-साहक म्हणावे.
२) "तुझी दुरता त्याहुनि साहवे" ( अग्रलेख )
कवितेत मात्रावृत्ताच्या निकडीपायी कधी कधी र्‍हस्व अक्षर दीर्घ वा दीर्घ अक्षर र्‍हस्व करण्याची मुभा असते. वरील अवतरण हे अवतरण चिन्हात दिलेले नसल्याने, तो एक साधा मथळा होतो व त्यात "दूरता"च असायला हवे. अग्रलेखाच्या शेवटीही असेच वाक्य आहे: "दुर्बळ क्षुद्रांचा शृंगार पाहण्यापेक्षा तुझी दुरता त्याहुनि साहवे, असे त्यांनीच लिहुन ठेवले आहे, ते योग्यच म्हणायचे ". ह्या वाक्यातही कवितेच्या ओळी गद्यात लिहिलेल्या असल्याने व त्या अवतरणात नसल्याने त्यातली "दुरता", "दूरता"च हवी.
३)  वरील अग्रलेखातले एक वाक्य : " हल्ली बरेच कवी आपले कवीपण आणि कविता चुरमुरेवाल्यासारख्या अंगावर घेऊनच मिरवीत असतात आणि कोणी भेटल्यावर चुरमुरेवाल्याप्रमाणे त्यातल्या दोन पाच काढून समोरच्याच्या हातावर ठेवतातही." ह्या वाक्यातले कवी दोन गोष्टी अंगावर नेत आहेत, कवीपण आणि कविता. कवीपण नेले तर "चुरमुरेवाल्यासारखे" आपण म्हणू. त्याच बरोबर कविताही नेल्या तरीही "चुरमुरेवाल्यासारखे"च म्हणायला हवे. चुरमुरेवाले अनेक नसल्याने "चुरमुरेवाल्यांसारख्या" असे नाहीय. सारखेपण दाखवताना ते आपण "चुरमुरेवाल्यासारखे" असे दाखवत आहोत. त्याने अनेक वस्तू अंगावर नेल्या तरीही "चुरमुरेवाल्यासारखे" असेच म्हणायला हवे.
४) "वधारलेले समभाग.......घसरलेले समभाग" अर्थवृत्तांत ह्या सदरातले हे उप-मथळे आहेत.
"घसरलेले समभाग" योग्य धरले तर, त्याविरुद्ध "चढलेले समभाग" असावे; "वधारलेले समभाग" योग्य धरले तर, "घटलेले समभाग" असावे.
५) "संत साहित्य संमेलनाच्या परिसंवादातील सूर"; "राजकीय व संत विचार एकमेकांना पूरक"
"संत-साहित्य" असा प्रकार असतो तेव्हा ते "संत-साहित्य" असे प्रकारदर्शक लिहावे लागते. तसेच राजकीय विचार ह्याच्या विरुद्धचे विचार "संत-विचार" असे लिहायला हवे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा