मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

नेटके मराठी मथळे



लोकसत्ता ( दि. १ मार्च २०१२ ) मधून
------------------------------------------------
१) रिक्षांसाठी इलेक्ट्रॉनिक मिटरसक्तीस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
इलेक्ट्रॉनिक मिटरच हवे, इतर मिटर्स चालणार नाहीत हा एक नकार सक्ती ह्या शब्दात आहे. त्याला स्थगिती. स्थगिती ह्या शब्दातच जे आहे ते बाद करण्याचा नकार आहे. न्यायालयाचा नकार, ह्यात परत नकार आहे. इतके नकार एका मथळ्यात देण्याने नकार-घंटाच वाजते. त्या ऐवजी "इलेक्ट्रॉनिक मिटरच हवे, असे न्यायालयाचेही मत" असे सोपे नसते झाले ?
२) तेलगीला साथ देणार्‍या तीन पोलीस अधिकार्‍यांना सहा वर्षे सक्तमजूरी
तपासात त्रुटी ठेवल्याने तेलगीला एक प्रकारे मदतच केली असा न्यायालयाचा निष्कर्ष असला तरी जी शिक्षा देतात ती गुन्ह्याला असते.  समजा एखाद्या पोलीस अधिकार्‍याने तेलगीच्या उद्योगात पैसा गुंतविला असता तर तो त्याच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष मदत, साथ देण्याचा गुन्हा झाला असता. पण तपासात त्रुटी ठेवणे, हे आपले काम वा कर्तव्य नीट न निभावणे ह्या गुन्हयाचे होते. जी शिक्षा झालीय ती सदोष तपासामुळे. कायद्याच्या भाषेत साथ देणे वेगळे व तपास सदोष करणे वेगळे. ही जर साथ असती तर कायद्याने कदाचित ज्यास्त शिक्षा केली असती. "सदोष तपासासाठी सहा वर्षांची सक्तमजूरी" असा मथळा हवा होता.
३) फरदीन खानची कोकेनप्रकरणातून अखेर सुटका
पूर्ण बातमी वाचल्यावर कळते की ह्याने व्यसनमुक्ती करविली व त्या परिमार्जनामुळे त्याला माफी मिळाली आहे. "अखेर सुटका" मुळे त्याच्यावरचा आरोप सिद्ध न झाल्याने त्याला सोडले असा समज तयार होतो. उलट इथे मिळालीय ती एक प्रकारची माफी आहे. गुन्हा केलेला आहेच, पण परिमार्जन केलेले असल्याने कोर्टाने त्याला सोडले आहे. शिवाय परत व्यसन केलेले आढळले तर पकडल्या जाईल ही टांगती तलवार आहेच. त्यामुळे "फरदीन खानला व्यसनमुक्तीमुळे माफी" असा मथळा हवा होता.
४) नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांचे "पर्यावरण" बदलणार
बातमी "पर्यावरण" ह्या विषयाविषयी आहे. त्याचे श्रेणी मूल्यमापन जाऊन गुणांकन होईल असा नवा बदल आहे. अवतरणात घातले तरी मथळ्याचा अर्थ विषयाखेरीज इतर बाबी संबंधी काही तरी बदल आहे असा होतो. "पर्यावरण" विषयाचे आता गुणांक मिळतील हा मथळ्याचा मतितार्थ असायला हवा होता.
५) पंतप्रधानांच्या भाषणात तांत्रिक अडचण--गोव्यातील प्रचारसभेत ध्वनिवर्धक बिघडला.
इंग्रजी वर्तमानपत्रातल्या बातमीत माईक बिघडला असे आहे. माईक म्हणजे मायक्रोफोन. हे उपकरण सूक्ष आवाजाला उचलते व मग लाऊड-स्पीकर्स मधून ध्वनिवर्धन होते.. जे मोठे मोठे डब्बे असतात त्यांना लाऊड-स्पीकर्स म्हणतात. ते खरे ध्वनिवर्धक म्हणता येतील. इंग्रजी-मराठी कोशात माइक्रोफोनला ध्वनिग्राहक असे म्हटले आहे ते त्याच्या कार्याचे बर्‍यापैकी वर्णन करणारे आहे. पण माइक्रोफोनला ध्वनिवर्धक म्हणता येणार नाही.
-----------------------------------------------------------------------------

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

लोकसत्ता की शुद्धलेखनाची सत्ता !






लोकसत्ता ( दि.२७ फेब्रुवारी २०१२) मधून
----------------------------------------------
१) "अणुबॉम्बरोधक पोलीस इमारतीचा प्रस्ताव आयुक्तांनीच फेटाळला"
इमारती बांधतांना समजा त्या भूकंपाचे तीव्र कंप/झटके सहन करणार्‍या अशा बांधतात, तेव्हा त्यांना भूकंपविरोधक किंवा भूकंप-रोधक  कसे म्हणता येईल ? त्या काही भूकंप थांबवत नाहीत, फार तर त्या भूकंप साहतात. तेव्हा त्यांना भूकंप-साहक म्हणणे ज्यास्त सयुक्तिक होईल. तसेच एखादी ईमारत अणुबॉम्ब हल्ल्याचे परिणाम साहणारी असेल तर तिला "अणुबॉम्ब-रोधक" कसे म्हणता येईल ? अणुबॉम्ब-साहक म्हणावे.
२) "तुझी दुरता त्याहुनि साहवे" ( अग्रलेख )
कवितेत मात्रावृत्ताच्या निकडीपायी कधी कधी र्‍हस्व अक्षर दीर्घ वा दीर्घ अक्षर र्‍हस्व करण्याची मुभा असते. वरील अवतरण हे अवतरण चिन्हात दिलेले नसल्याने, तो एक साधा मथळा होतो व त्यात "दूरता"च असायला हवे. अग्रलेखाच्या शेवटीही असेच वाक्य आहे: "दुर्बळ क्षुद्रांचा शृंगार पाहण्यापेक्षा तुझी दुरता त्याहुनि साहवे, असे त्यांनीच लिहुन ठेवले आहे, ते योग्यच म्हणायचे ". ह्या वाक्यातही कवितेच्या ओळी गद्यात लिहिलेल्या असल्याने व त्या अवतरणात नसल्याने त्यातली "दुरता", "दूरता"च हवी.
३)  वरील अग्रलेखातले एक वाक्य : " हल्ली बरेच कवी आपले कवीपण आणि कविता चुरमुरेवाल्यासारख्या अंगावर घेऊनच मिरवीत असतात आणि कोणी भेटल्यावर चुरमुरेवाल्याप्रमाणे त्यातल्या दोन पाच काढून समोरच्याच्या हातावर ठेवतातही." ह्या वाक्यातले कवी दोन गोष्टी अंगावर नेत आहेत, कवीपण आणि कविता. कवीपण नेले तर "चुरमुरेवाल्यासारखे" आपण म्हणू. त्याच बरोबर कविताही नेल्या तरीही "चुरमुरेवाल्यासारखे"च म्हणायला हवे. चुरमुरेवाले अनेक नसल्याने "चुरमुरेवाल्यांसारख्या" असे नाहीय. सारखेपण दाखवताना ते आपण "चुरमुरेवाल्यासारखे" असे दाखवत आहोत. त्याने अनेक वस्तू अंगावर नेल्या तरीही "चुरमुरेवाल्यासारखे" असेच म्हणायला हवे.
४) "वधारलेले समभाग.......घसरलेले समभाग" अर्थवृत्तांत ह्या सदरातले हे उप-मथळे आहेत.
"घसरलेले समभाग" योग्य धरले तर, त्याविरुद्ध "चढलेले समभाग" असावे; "वधारलेले समभाग" योग्य धरले तर, "घटलेले समभाग" असावे.
५) "संत साहित्य संमेलनाच्या परिसंवादातील सूर"; "राजकीय व संत विचार एकमेकांना पूरक"
"संत-साहित्य" असा प्रकार असतो तेव्हा ते "संत-साहित्य" असे प्रकारदर्शक लिहावे लागते. तसेच राजकीय विचार ह्याच्या विरुद्धचे विचार "संत-विचार" असे लिहायला हवे.


बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३






-----नेटके मराठी मथळे---------
---------------------------------------------
लोकसत्ता ( १४-१०-२०११ ) मधून
---------------------------------------------
१) "धनादेशाद्वारे वीजबिल भरणार्‍या ग्राहकांना "महावितरण"चा झटका"
काही काही शब्द अंगवळणी पडले की ते मराठी की बिगर-मराठी हे कळेनासे होते. आता "चेक" हा शब्द "बिल" इतकाच इंग्रजी आहे. त्याला "धनादेश" म्हणताना एक पर्यायी शब्द रूढ करणे ही चांगली सद्‌भावना आहे. मग असेच धोरण ठेवून "वीजबिल" ऐवजी "वीजदेयके" ही चांगले ठरले असते.
२) "सायनात नंबर वन होण्याची क्षमता: अपर्णा"
"नंबर वन" हेही इंग्रजी, शिवाय "सायनात क्षमता" हे भाषांतर केल्यासारखे होते. त्याऐवजी "सायनाला अग्रक्रमांक शक्य: अपर्णा" हे कसे वाटेल ?
३) "नॅशनल स्कूल ऑफ दुबे"
हे "नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा"चे विनोदाने केलेले सूचक नामाभिधान आहे. आपल्याकडे "कर्व्यांची शाळा"; "आगरकरांची शाळा"; "नापासांची शाळा" असे म्हणत. त्याच धर्तीवर "दुब्यांची शाळा" चालले असते व ते गुरुस्थानी होते हेही जाणवले असते.
४) "भारताच्या विजयाला धोनीचा "परिसस्पर्श"".
लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते. धोनीचा स्पर्श हा परिसस्पर्श आहे असे म्हणायचे असेल तर मग तो "विजयाला" न म्हणता "भारताच्या हरण्याला" हे रास्त ठरले असते.
५) "पालिका वेतनकरारावर आज कोर्टाचा निर्णय"
कोर्ट जितके इंग्रजी व अंगवळणी तेवढेच न्यायालयही अंगवळणी पडलेले आहे. मग त्याचा प्रसार का करू नये ?

--------------------------------------------------------------------------------------