बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

नेटके मराठी मथळे
--------------------------------
"महासत्तेतील मुखंड" ( लोकसत्ता: दि.२ आक्टोबर २०१३ मधून )
---------------------------------------
"मुखंड" म्हणजे पुढारी, मुख्य, किंवा म्होरक्या असा अर्थ आहे हे फार थोड्यांनाच माहीत आहे. संपादकाचे काम जर "शहाणे करून सोडावे, सकल जन’ असे मानले तर हा शब्द शीर्षकात वापरला हे चांगलेच धोरण म्हणावे लागेल. पण त्याच बरोबर आपल्याला जे म्हणायचे आहे ते नेमकेपणे म्हणणे हे लेखकाचे "मूळ कसब" निष्ठेने वापरायचे म्हटले तर गोंधळाचीच परिस्थिती आहे असे जाणवेल. कसे ?
संपादकीय आहे अमेरिकेचे काही व्यवहार सध्या जे बंद झाले आहेत ते कसे रिपब्लिकन पार्टीच्या कॉंग्रेस मधल्या पुढार्‍यांनी अडेलतट्टू धोरण अवलंबित ओबामाला हेल्थकेअर साठी पैसे नाकारले त्यावरच्या टिप्पणीचे आहे. म्हणजे ह्यातून संपादक आपल्याला जाणवून देत आहेत की हे पुढारी "अडेलतटटू" आहेत. अमेरिका ही महासत्ता व त्या महासत्तेतील हे मुखंड पहा ! असेच संपादक दाखवत आहेत.
मुळात "मुखंड" हा वापरातला शब्द नाही. तशात पुन्हा ह्या शब्दाला भूखंड, मूर्ख, खंड इत्यादी शब्दांच्या अंशामुळे व ह्या अंशाच्या अर्थामुळे एक प्रकारचा नकारार्थी अर्थ येतो. नुसता मुखंड हा शब्द घेतला व त्याचा शब्दकोशातला अर्थ घेतला तर त्यात नकारात्मक काही नाही. पण आजकाल राजकारणातले पुढारी त्यांच्या वर्तणुकीने एवढे नकारात्मक झालेले आहेत की ह्या शब्दालाच एक नकारात्मक अर्थ आलेला आहे. ( हा शब्द मुळात कसा वापरीत असत हे पाहताना तुकडोजींच्या ग्रामगीतेतला हा उल्लेख पहा : जो करील कायदाभंग । त्यासि दंड द्यावा लागवेग । यासाठी नेमावा लागे मग । राजा सत्ताधीश मुखंड ॥ ( अध्याय आठवा, ॥२०॥ )).
त्यामुळे योग्य शीर्षक/मथळा द्यायचा तर, "महासत्तेतील अडेलतटटू" हे जास्त नेमके झाले असते !
-------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा