शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

नेटके मथळे : ८८

नेटके मथळे--८८
----------------------------
लोकसत्ता दि. २२ आक्टोबर २०१३ मधून
-----------------------------------------
वर्तमान पत्रात आपल्याला कधी कधी नेटके मथळे दिसत नाहीत. किंवा ते खुपतातच. असे एकेक मथळे उदाहरण म्हणून घेऊ यात. आता हा एका पहिल्या पानावरच्या बातमीचा मथळा पहा : " दहावीचे विद्यार्थी ऐन दिवाळीत अर्जबाजारी होणार"
अर्थातच "अर्जबाजारी" असा काही मराठीत शब्द नाही पण "कर्जबाजारी"ला यमक जुळवत व त्या अर्थाने हा शब्द इथे वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यास पुष्कळांचे देणे आहे असा किंवा देणी देण्यास असमर्थ असलेला असा बॅंक्‌रप्ट ह्या अर्थाने "कर्जबाजारी" आपण वापरतो. कर्जबाजार्‍याला जसे एकेकाचे कर्ज फेडावे लागते तसे काहीसे इथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे झाले आहे असे ह्या बातमीदाराचे/संपादकाचे मत आहे. बातमीत म्हटलेय की ऑनलाईन अर्ज करायचा होता तो काही तांत्रिक बाबींमुळे होत नाहीय तर आता दिवाळीच्या सुटीत हे अर्ज मॅन्युअली भरावे लागणार आहेत. कर्जबाजारी जसा कर्ज भरण्यास समर्थ नसतो तसे काही इथे अर्ज करण्याची असमर्थता दिसत नाहीय. फक्त ऑनलाईन ऐवजी मॅन्युअली अर्ज करावे लागताहेत व सुटीत हे करावे लागते आहे हे बातमीत कळते. अर्ज करण्याची असमर्थता इथे दिसत नाही. म्हणजे अर्जबाजारीपणा दिसत नाहीय. हां अर्ज-बेजारीपणा अवश्य आहे.
नवीन शब्द करणे आणि ते लोकांच्या अंगवळणी पडावेत म्हणून आवर्जून वापरणे हा हेतू निश्चितच चांगला आहे. पण हा मथळा नेमका/नेटका होत नाही. मग काय असायला हवा होता ? तर, "दहावीचे विद्यार्थी ऐन दिवाळीत अर्जबेजार !"
----------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा